मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीत मविआचे एकही मत फुटले नसून लहान पक्षासह अपक्षांच्या मतांची ‘गंमत’ झाल्याचे नमूद करत फडणविसांना अनेक मार्गांनी माणसे आपलेसे करण्यात यश आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चमत्कार करून दाखवत आपल्या तिसर्या उमेदवाराला निवडून आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या माध्यमातून महाविकास आघाडीतील मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.
आज सकाळी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करतांना शरद पवार म्हणाले की, राज्यसभेचा निकाल हा आम्हाला मान्य आहे. राजकारणात रिस्क घ्यावीच लागले, ती उध्दव ठाकरेंनी घेतली. मात्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी लोकांना आपलेसे केले. महाविकास आघाडीचे एकही मत फुटले नाही. तथापि, लहान पक्षांनी गंमत केली असल्याचे सूचक उदगार त्यांनी काढले. तर भाजपने रडीचा डाव खेळून आणि कारवाईचा धाक दाखवून काही मते आपल्याकडे वळवून घेतल्याने त्यांना एका जागेवर यश आले आहे. मात्र याचा राज्याच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला.
शरद पवार म्हणाले की, राजकारणात चमत्कार होतच असतात. फडणवीस यांनी चमत्कार केल्याचे आपल्याला मान्यच करावे लागले. यासोबत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन देखील केले.