लेकीसाठी बारामतीचे मतदार बनले शरद पवार; आधी मुंबईत करायचे मतदान

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीची तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानासाठी प्रक्रिया पार पाडली जात आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांचा सामना राष्ट्रावादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत होत आहे. यासाठी शरद पवार यांनी मुंबईतील मतदार यादीतून आपले नाव वगळता बारामतीतून मतदान करत आहेत.

शरद पवार व त्यांचे कुटुंबीय बारामतीच्या गोविंद बाग येथे वास्तव्यास असतात. आतापर्यंत ते व त्यांचे कुटुंबीय मुंबईत मतदान करत होते. मुंबईतील महालक्ष्मी येथील वॉर्ड क्रमांक 214 मधील मतदार यादीत शरद पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे यांच्या नावांचा समावेश होता. पण यंदा हे सर्वजण बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मतदान करणार आहेत. शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी बीसीसीआयची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी आपले मतदान ओळखपत्र बारामतीहून मुंबईत वर्ग केले होते. त्यांनी सकाळी माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे व मुलगी रेवती सुळे तथा मुलगा विजय सुळे यांनीही आपले मतदान केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.त्यानुसार शरद पवार आपल्या कन्या सुप्रिया सुळेंसाठी बारामतीचे मतदार बनले आहे.

 

Protected Content