जाणीवपूर्वक घेतली मुक्ताईनगरातून माघार- शरद पवार

sharad pawar in jalgaon

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरात पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार ही जाणीवपूर्वक घेण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते आज पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आलेले शरद पवार यांनी आज सकाळी जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधार्‍यांवर कडाडून टीका केली. जळगाव जिल्ह्यातदेखील विकासाच्या नावाने ठणठणाट असल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. याप्रसंगी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार का घेतली ? असा प्रश्‍न विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले की, फक्त मुक्ताईनगरच नव्हे तर राज्यातील काही मतदारसंघांमध्ये याच प्रकारे माघार घेण्यात आलेली आहे. ही निवडणूक अतिशय महत्वाची असून अगदी एकेक जागा महत्वाची आहे. भाजप-सेनेला पराभूत करणे याला आमचे प्राधान्य आहे. यामुळे मुक्ताईनगरात आम्ही रवींद्रभैय्या पाटील यांना विनंती करून माघार घ्यायला लावल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकही जागा निवडून येणार नसल्याचा दावा केल्याबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, महाजन काहीही बोलू शकतात. याप्रसंगी त्यांनी आपण सत्तेवर आल्यास सरसकट कर्जमाफी करू याचा पुनरूच्चार केला. तर कलम ३७० चा या निवडणुकीत काहीही परिणाम होणार नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. याप्रसंगी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, हाजी गफ्फार मलीक, करण खलाटे, विलास पाटील व मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Protected Content