मुंबई प्रतिनिधी । देशाच्या सरन्यायाधिशपदी (चीफ जस्टीस ऑफ इंडिया) मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते १८ नोव्हेंबरला कार्यभार सांभाळणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान सरन्यायाधिश न्या. रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. गोगोई यांनी आपल्यानंतर शरद बोबडे यांची नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. याला मान्यता मिळाली असून राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी त्यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केल्याने आता न्या. बोबडे हे १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधिशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. २०२१ पर्यंत ते आपल्या पदावर राहणार आहेत. त्यांना तब्बल दोन वर्षांचा कालखंड मिळणार आहे. मूळचे नागपुरकर असणार्या बोबडे कुटुंबात विधी क्षेत्राची उज्ज्वल परंपरा आहे. त्यांचे आजोबा अॅड. श्रीनिवास बोबडे हे विख्यात विधीज्ज्ञ होते. त्यांचे वडील अॅड. अरविंद बोबडे यांनी दोन वेळेस राज्याचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले होते. विशेष म्हणजे त्यांचे बंधू विवेक हेदेखील सर्वोच्च न्यायालयात वकील होते.
न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९७८ मध्ये त्यांनी नागपुर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केले. यानंतर त्यांनी लागलीच नागपुर खंडपीठात विधीज्ज्ञ म्हणून काम सुरू केले. १९९८ साली ते वरिष्ठ अधिवक्ता बनले तर २००० साली मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०१२ साली त्यांना मध्यप्रदेशचे मुख्य न्यायाधिश बनविण्यात आले. तसेच १२ एप्रिल २०१३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिश बनले. २०१६ मध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सीटीचे कुलपती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. तर आता ते चीफ जस्टीस ऑफ इंडिया बनणार आहेत. देशाचे ४७ वे सरन्यायाधिश म्हणून ते जबाबदारी पार पाडणार आहेत.