जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ला `सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)` या महत्त्वाकांक्षी व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे नंदुरबार येथील आदिवासी समुदायाच्या क्षेत्रात विकासाला हातभार लावणा-या प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी 13 कोटी 95 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खेडी आणि शहर यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अधारित प्रक्रिया म्हणजे ‘सिलेज’ (City Like Villages)` तंत्रज्ञानाकरीता भाभा अणुसंशोधन केंद्रासोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. अशी माहिती कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘सिलेज’ आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात आला. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी या प्रकल्पाबाबत प्रचंड आस्था दाखवून आकार दिला व दीड वर्षापूर्वी विद्यापीठात झालेल्या बौठकीत दिवसभर या प्रकल्पावर झालेल्या चर्चेत सहभाग घेवून काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. विद्यापीठाने या प्रकल्पाचा प्रस्ताव राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने या प्रकल्पाला मान्यता देवून जून महिन्यात 13 कोटी 95 लाख 91 हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्यशासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या 25 एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी व आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगी विज्ञान, समुच्चित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, कार्यक्षेत्रातील आदिवासी व अन्य समुहांमध्ये परस्पर सहकार्य – सहयोग व समन्वय प्रस्थापित करण्यास सहाय्यभूत होणे अशी काही अकादमीची उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहे. या अकादमी अंतर्गत सिलेज आधारित प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्याचे आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच Tribal Rural Urban Education Integrated (TRURE ICP) विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत. असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले.
काय आहे `सिलेज` : या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी सिलेज विषयी सविस्तर माहिती दिली. शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे एकत्रिकरण करणे म्हणजे सिलेज. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून, येथील पर्यावरणाला पूरक अशी असणार आहे. ग्रामिण व आदिवासी भागाला टाळून निरोगी विकास होणे शक्य नाही. त्यामुळे तेथील गरजा लक्षात घेवून, या प्रकल्पांतर्गत काही उपक्रम राबविले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील 100 गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी `विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र Science and Technology Entrepreneurship Resource (STERN)` नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे. याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, कार्यशाळा, जनजागृती अभियान आणि क्षेत्रीय भेटी देखील असणार आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.
संशोधनाची नाळ समाजाशी जोडणे आवश्यक असून संशोधनातून तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून संपत्ती, आणि संपत्तीतून दारिद्रय निर्मूलन असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे या डिजीटल युगात सिलेज आधारित हा नवा प्रयोग अंत्यत उपयोगी असा राहणार आहे. सिलेज आधारित कल्पना शहरात अस्तित्वात येणे शक्य नाही. ही केवळ ग्रामीण भागात शक्य आहे. सिलेज उपक्रमात शिक्षण पध्दतीला नवा आकार देण्याची शक्ती आहे, ज्यातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अधिक वाव प्राप्त होणार आहे. या उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग घेतला जाणार आहे. ज्यामुळे आदिवासी समुहाच्या प्रश्नांची जाणीव आणि या प्रश्नांची उकल या विद्यार्थ्यांना या प्रकल्पामुळे शिकतांनाच मिळणार आहे. तंत्रज्ञान आधारित शिक्षण आणि ज्ञान आधारित प्रगतीचा मार्ग सिलेज आधारित प्रकल्पामुळे सुकर होणार आहे.
या पत्रकार परिषदेला या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक व आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.