जळगाव, प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके वाजविल्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर अपायकारक परिणाम होतात. हे होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बध घालण्याबाबत अंतरिम आदेश देण्यात आलेले आहे.
त्यानुसार केंद्रशासन, केंद्रशासीत प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकाराच्या राजपत्रानुसार प्रकाशीत केलेल्या पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतूदींचे मुख्यत्वे करुन या नियमातील सुधारित नियम जे फटाकाच्या आवाजाच्या मानांकाबाबत आहेत. त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबाबी खालील प्रमाणे आहे.
एखादा फाटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणा-या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. जर साखळी फटाक्यात एकूण पन्नास, पन्नास ते शंभर व शंभर ते त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागे पासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 150, 110 व 105 डेसीबल एवढी असवी. त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. फटाक्यांची दारुकाम किंवा फटाके सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधी व्यतिरिक्त उडविण्यास परवानगी देण्यात येवू नये. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दारुकाम व फटाके यांचा वापर करण्यात येवू नये. शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येवू नये.
शांतता परिसरामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांचे संभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र येते. राज्याच्या शिक्षण विभागाचे राज्यातील शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापक व मुख्यध्यापक यांना ध्वनी व हवा प्रदुषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थाना योग्य प्रशिक्षण देण्याच्यादृष्टीने पावले उचलवावीत. सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेशाने ध्वनी/हवा प्रदुषणाबाबत जनजागृती करावी. सर्वोच न्यायालयाच्या वरील निर्देशांचे सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे पालन करावे. वर उल्लेख केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके/साखळी फटाके जप्त करुन त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी. अपघात घडणार नाही याची स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी. आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करुन ठेवण्याची दक्षता घ्यावी. दिवाळी हा आनंदपर्व साजरा करतांना योग्य ती दक्षता जनतेने घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावेत. असे आवाहन राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.