आदीवासी युवक-युवतींची फसवणूक करणाऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी

 

यावल,  प्रतिनिधी  ।  येथील आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयाअंतर्गत शासनाच्या कौशल्य विभागाव्दारे आदीवासी युवक युवतींना दिले जाणारे शिलाई मशीन प्रशिक्षण योजनेत शासन व लाभार्थ्यांची फसवणुक केल्या प्रकरणातील संशयीत आरोपीस पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल येथील आदीवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कौशल्य योजना या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी युवक व युवतींना शासनाच्या वतीने सन ४ मार्च २०१४ते २०१७या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतीज्योती प्रमिलाजी चव्हाण महीला मंडळ या संस्थेस शासन अटीशर्ती नियमांच्या अधिन राहुन ११८युवक युवतींना ३ महीन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ९ हजार७०० रुपये असे सुमारे १२ लाख रुपये सदरच्या संस्थेला देण्यात आली होती. परंतु, संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणाचे कुठलेही कार्यक्रम न राबविता गोरगरीब आदीवासी लाभार्थ्यांची व शासनाची फसवणुक करण्यात आली असता यावल आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुर्जगंराव झंपलवाड (वय ५२ वर्ष रा . यावल ) यांनी यावल पोलीसात  क्रांतीज्योती प्रमिलाजी महीला मंडळच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (रा. लोहारा पोस्ट मंगरूळ ता मानवत जिल्हा परभणी) व शिवाजी रमेश जाधव (रा. दक्षिण विहार अपार्टमेंट कांचनवाडी पैठण रोड औरंगाबाद )यांनी संगनमताने आदीवासी युवक युवतींची व शासनाची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून घेतले ताब्यात 

 यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलीस अमलदार निलेश वाघ , पोलीस वाहनाचे खाजगी वाहन चालक नसीर खान या आरोपींच्या शोध मागावर असलेल्या पथकाने या गुन्ह्यातील संशयीत आरोपी रमेश शिवाजी जाधव याच्यामुळ लोहारा तालुका मानवत जिल्हा परभणी गावी जावुन लोहारा ता मानवत  बिटचे सहाय्यक फौजदार अशोक तठे यांच्या माध्यमातुन आरोपींचे नातेवाईक मुंजा अण्णासाहेब जाधव यांच्या समोर ओळख पटवुन शेतातुन अटक करण्याचे प्रयत्न केले असता संशयीत आरोपी रमेश शिवाजी जाधव (वय ४० वर्ष) याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला.  पोलीसांनी खडतर मार्गावर आपले जिव धोक्यात घालुन त्याचा १० ते १२ किलोमिटर सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्यास अटक केली. त्यास  यावल येथे आणण्यात आले असून,  आज आरोपीस न्यायलयात हजर केले असता त्यास न्यायलयाने ७ दिवसाची म्हणजेच २३ एप्रिल पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content