चेन्नई, वृत्तसंस्था | बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना चक्क सहा बहिणी आहेत. ही माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण याबद्दल फारसे कुणाला काही माहित नाही. चित्रपट कलाकारांचे खाजगी आयुष्य तसे गूढच असते. पण सोशल मीडियामुळे आता त्यांच्याबद्दलची बरीच माहिती त्यांच्या चाहत्यांना उपलब्ध होऊ लागली आहे. त्यातलाच हा एक फोटो आहे. या फोटोमध्ये रेखा त्यांच्या सहा बहिणींसोबत दिसत आहेत. हा फोटो तसा तीन वर्षे जुना आहे.
रेखा व त्यांच्या बहिणी चेन्नई येथील जी.जी. सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये रेखा यांनी त्यांची आवडती कांजीवरम साडी नेसली आहे. त्यांच्या बाजूला त्यांच्या बहिणी उभ्या आहेत.
रेखा यांच्या बहिणींची नावे जया श्रीधर, रेवती, स्वामिनाथन, कमला सेलवराज, राधा उसमान सैयद, नारायणी गणेशन आणि विजया चामुंडेश्वरी अशी आहेत. जेमिनी गणेशन यांना अलामेलू या पहिल्या पत्नीपासून रेवती, कमला, जयलक्ष्मी आणि नारायणी चार मुली आहेत. रेखा आणि राधा या जेमिनी यांच्या दुसऱ्या पत्नी पुष्पावली यांच्या मुली आहेत. ‘महानटी’ हा तेलुगू सिनेमा जेमिनी गणेशन यांची तिसरी पत्नी सावित्री यांचा बायोपिक आहे. ‘महानटी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारामुळे चर्चेत होता. या सिनेमात सावित्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री किर्ती सुरेशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.