Home Cities जळगाव जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाला’ उत्साहात सुरुवात 

जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाला’ उत्साहात सुरुवात 

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतासह संपूर्ण राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ जळगाव जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले.

‘सेवेतून समाधान आणि लोकसहभागातून ग्रामीण विकास’ हा संदेश देत या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, पोषण आणि जनजागृतीपर उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. अभियानातील विविध उपक्रमांसाठी जिल्हा स्तरावरून जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भुसावळ तालुक्यातील खंडाळा व वांजोळा येथे भेट देऊन अभियानातील उपक्रमांची पाहणी केली.  जळगाव तालुक्यात विविध दाखल्यांच्या वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात आली. कानळदा येथे पुरातन विहिरीची स्वच्छता करून ऐतिहासिक जलस्रोतांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी चंद्रकांत बोढरे उपस्थित होते.

जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथे ‘एक दिवस गावासाठी’ या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम आणि वृक्षलागवड करण्यात आली. नागरिकांना जन्म व विवाह दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी एस. एस. इंगळे उपस्थित होते.

एरंडोल तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींमध्ये अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले वितरित करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी सौरभ निकम उपस्थित होते.

धरणगाव तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर सेवा संकल्प सभा आणि वृक्षलागवड उपक्रम घेण्यात आले. शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्येही विविध कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच VB-G RAM G अंतर्गत ‘जलतारा’ आणि इतर विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी सागर कोल्हे उपस्थित होते.

चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा घेण्यात आल्या. शाळांमध्ये चित्रकला, रांगोळी आणि स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी एस. टी. मोरे उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात पंचायत समिती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची शपथ घेतली. यावेळी गट विकास अधिकारी के. बी. अंजने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भडगाव तालुक्यात पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर नागरिककेंद्रित सेवा तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

पारोळा तालुक्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी भूषण कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यात शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत परिसरात रांगोळीच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाचा संदेश देण्यात आला. पोषण माह सप्ताहाची शपथ घेण्यात आली. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले. तसेच ‘जलतारा’ कामांनाही प्रारंभ करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चोपडा तालुक्यात ग्रामस्थांच्या सभा घेण्यात आल्या. चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विवाह नोंदणी प्रमाणपत्र वाटपाची विशेष मोहीमही राबविण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी अंजली बर्गे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावल तालुक्यात स्वच्छता आणि दाखले वाटपासोबत चित्रकला, रांगोळी तसेच पोषक खाद्यपदार्थांच्या सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामुळे अभियानाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग मिळाला. यावेळी गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड उपस्थित होत्या. रावेर तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दाखले वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विनोद मेढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुक्ताईनगर तालुक्यात पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी किर्ती कनवाडे उपस्थित होत्या. बोदवड तालुक्यात पंचायत समिती स्तरावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर विविध दाखल्यांचे वाटप करण्यासोबतच नागरिकांच्या सहभागातून लोकाभिमुख उपक्रम घेण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतल्याने ‘सेवा संकल्प अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पुढील कालावधीतही विविध लोकाभिमुख सेवा, स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, पोषण आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “सेवा संकल्प अभियान हे केवळ कार्यक्रम न राहता लोकसहभागाची चळवळ बनावी. प्रत्येक गावातील नागरिकांचा सहभाग वाढवून सेवाभावी आणि स्वच्छ ग्रामीण विकासाला गती देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सांगितले.


Protected Content

Play sound