पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत पाचोरा येथील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभाग, बार्टी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विविध शैक्षणिक योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले हे होते, तर उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी समाजकल्याण तथा बार्टीचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेश, जात प्रमाणपत्र पडताळणी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध असणाऱ्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली.

एकही विद्यार्थी शासकीय योजनांच्या माहितीपासून वंचित राहू नये, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत अनिल पगारे यांनी शाळा, महाविद्याارت तसेच गाव-वस्तीपर्यंत वर्षभर जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रावण तडवी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश वळवी यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शारदा शिरोळे यांनी मानले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.



