जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तसेच समाजात वाचन संस्कृतीची रुजवणूक व्हावी या उद्देशाने दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, संस्था व मंडळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आजच्या डिजिटल युगात नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, आवांतर वाचनातून ज्ञानवृद्धी व्हावी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी या विशेष दिनाचे आयोजन केले जाते. वाचनामुळे माणसाचे विचार प्रगल्भ होतात आणि वैचारिक समृद्धी प्राप्त होते, हीच गोष्ट जनमानसात बिंबवण्यासाठी जिल्हाभरात विविध साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत.




