जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुमच्या घरात भूतबाधा व आत्मा असल्याने घरात वाद होत असल्याची बतावणी करत भूतबाधा दूर करण्याचे सांगत जळगावातील एका जोडप्याला भोंदूबाबाने तब्बल साडेअकरा लाखांत चूना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात भोंदुबाबासह त्याची पत्नी विरोधात महाराष्ट्र नरबळी, जादुटोणा व इतर अमानुष, अघोरी प्रथा विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या ललित हिम्मतराव पाटील आणि महिमा उर्फ मनोरमा ललित या दांपत्याने आपल्यामध्ये अघोरी शक्ती असल्याचे भासवून तुमचे कौटुंबिक स्वास्थ आणि आर्थिक प्राप्ती करून देतो, करावी बाधा दूर करतो असे सांगत जळगावच्या एका जोडप्याला तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांत फसवणूक केली आहे.
जळगाव येथे राहणारे दांपत्य कोरोना काळात तणावात होते. या दाम्पत्याच्या पत्नीला तिची कॉलेजची मैत्रीण मोहिनी हिने माझ्या घरी ये. माझे पती यावर काहीतरी उपाय करतील असे सांगितले. सावखेडा शिवार येथील मेरा घर अपार्टमेंटमध्ये गेल्यावर ललित पाटील यांनी सांगितले की, नुकताच मृत झालेल्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य. शिवाय तुमच्या घरावर बाहेरची बाधा असल्याने नोकरीत अपयश, आर्थिक चणचण, घरात वाद, पती पत्नी मध्ये भांडण होते. अशा प्रकारे घरगुती ओळखीचा फायदा घेत महिमा ललित पाटील हिने आपल्या पती ललित अघोरी पुजा करतो. त्याच्या अंगात अजमेर चा पीर येतो. असे सांगत विश्वास संपादन केला. करुन पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या भारतीय सिमे जवळील कनोट माता मंदिर परिसरातील गुप्तधन हवन पूजा विधी करून मिळणार आहेत . तसे आदेश बाबा दमदम नाथ, मकसुद भैय्या, सदगुरू नाथ माऊली यांच्या कडून मिळाले आहेत. त्यासाठी कनौट, ओंकारेश्वर, उजैन, अजमेर येथे होम हवन, पूजा विधी करावा लागेल. हबकलेल्या या पीडित दांपत्याने या भोंदू बंटी बबली च्या दाव्याला भुलून विविध ठिकाणी शांती पुजा, विधी होम हवन च्या नावे अक्षरशः 11 लाख 32 हजार रु ऑनलाइन पद्धतीने व रोख असे या भोंदुंना दिले. नातेवाईक, बचत गट यातून कर्ज घेत ही रक्कम उभी केली. गेल्या काही दिवसांत कर्ज वाढले स्वास्थ्य हरवले काय करावे? असं वाटतं असताना प्रकरण पोलिसात गेले तेंव्हा या बाबाने मी अघोरी शक्ती ने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका अशी धमकी दिली.
अखेर वेबसाईड वरुन या पीडित दांपत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा ऑफिस मध्ये संपर्क केला. सर्व प्रकरण समजून घेतल्या नंतर महा अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष समिती सदस्य नंदिनी जाधव(पुणे), राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख(पुणे), अण्णा कडलासकर (पालघर), महीला विभाग सदस्य निता सामंत(चाळीसगांव) यांच्या सोबतीने काल जळगाव पोलीसांना जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्या साठी धाव घेतली. जळगांव पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा उपअधीक्षक कुमार चिंता ,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, तालुका पोलीस निरीक्षक कुंभार, रामानंद पोलीसस्टेशन पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि काल रात्री आठ वाजता पोलिसांना विनंती अर्ज दिला. अखेर जळगाव पिंप्राळा जवळच्या रामानंद पोलिस ठाण्यात या भोंदू दाम्पत्या विरुध्द महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी, अमानुष, अनिष्ट प्रथा आणि जादुटोणा प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या कलम 3(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भोंदु दाम्पत्या कडून लुटलेली रक्कम मिळवून द्यावी तसेच अशाच प्रकारे फसवणुक झालेल्या इतर लोकांनी पुढे यावे आणि तक्रारी द्याव्या. तरच अशा भोंदूगिरी ला चाप बसेल असे आवाहन महा.अंनिस तर्फे करण्यात येत आहे.