मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या भारदस्त आवाजाने ओळखले जाणारे जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं.
एप्रिल १९७४ पासून सह्याद्री, दूरदर्शनच्या वृत्तनिवेदक म्हणून कार्य करणारे प्रदीप भिडे यांनी पुढे गेली चाळीस वर्ष प्रभावी कार्य करत जनमानसात आपल्या विशिष्ट शैलीने आकर्षण निर्माण केलं. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मराठी साहित्यात त्यांना विशेष रूची होती तर प्रसार माध्यमात करियर करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती. त्यामुळे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडेमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण बॉम्बस्फोट, अशा घटनांची बातमीपत्रे भिडे यांनी वाचली. निवेदकाने अशा वेळी भावनाविवश होता कामा नये तर त्रयस्थाच्या भूमिकेतून तटस्थ राहून बातम्या सादर करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत त्यानी मात्र अलिप्तपणा म्हणजे कोरडेपणा नव्हे तर आवश्यक त्या भावभावनांतून भिजलेली बातमी लोकांच्या कानावर पडायला हवी, असा त्यांचा आग्रह असायचा. प्रदीप भिडे यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट, सूत्रसंचालन, निवेदन करत आपला ठसा उमटवला.