मुंबई प्रतिनिधी । भाजपचे संकटमोचक म्हणून ख्यात झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवून तेथील निवडणूक जिंका असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. सामनातील आजच्या अग्रलेखातून त्यांनी हा खोचक सल्ला दिला आहे.
जेएनयूबाबत भाष्य
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनातील आजच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान करण्यात आले आहे. आजच्या अंकात कन्हैया कुमारच्या कोणत्या तोंडाने निषेध करणार ? या शीर्षकाखाली अग्रलेख प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये जेएनयूमधील कथित वादग्रस्त प्रकरणी कन्हैयाकुमार आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राबाबत भाष्य करण्यात आले आहे. या निमित्ताने भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरले नसून देशद्रोही चळवळयांनी येथे वाळवी लावली आहे काय? जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ईव्हीएममद्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे अवघड झाले आहे काय? असा टोला यातून मारण्यात आला आहे.
खोचक टोला
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी कालच एका मुलाखतीत जाहीर केले, ”मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन.” आमचे भाजपला आवाहन आहे, गिरीश महाजन यांच्यासारख्या कर्तबगार भाजप मंत्र्याला जेएनयूमध्ये मुक्कामाला पाठवा व देशद्रोह्यांचा पराभव घडवा. फक्त त्यांना इतकेच सांगा, जेएनयूमधील निवडणूक ईव्हीएमवर होत नाही असे यात खोचकपणे म्हटले आहे.
…यातच भाजपचे हित
यात पुढे म्हटले आहे की, कन्हैया कुमार बोलतो छान. तो देशातील बंडखोर, बेरोजगार तरुणांचा प्रतिनिधी आहे, पण म्हणून अफझल गुरू झिंदाबाद व कश्मीर आझादीचे नारे त्याला देता येणार नाहीत. अर्थात भाजप तरी कोणत्या तोंडाने कन्हैया कुमारचा निषेध करणार? अफझल गुरूला स्वातंत्र्यवीर मानणार्या, हुतात्मा ठरवणार्या मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापनेचे महापाप भाजपने कश्मीरात केलेच आहे. तेव्हा कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या हिताचे आहे.