तोंडचे पाणी पळवणारा ‘विकास’ (लेख )

रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांसह संपूर्ण भोवतालचे पर्यावरण उद्ध्वस्त केले जात असून यात आता विहरी बुजण्याची भर पडली आहे. या संवेदनशील विषयावर डॉ. मिनल कुष्टे यांचे हे भाष्य.

रस्ता रुंदी करणाच्या आड येणारे सर्व घटक नष्ट केल्या जात आहेत. हा कसला विकास ज्या मध्ये पाण्या सारख्या जीवनावश्यक गोष्टीचा विचार केला जात नाही! झाडांच्या मागोमाग आता विहिरीही बुजविल्या जात आहेत. सजीवांच्या पाण्याची गरज निसर्गाने नदी, झरे, नाले, ओढे, विहिरी यांच्या द्वारे पुरी केली. माणसाने विकास केला आणि नदी-नाले प्रदूषित केले; त्यांची गटारे झाली. आता पाण्याचा एकमेव स्त्रोत उरला तो म्हणजे विहिरी. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणात त्याच्या वर विकासाची वक्र दृष्टी पडली आहे.

सततची काही वर्षे विकासाचे कौतुक सुरु होते, रस्ता रुंदीकरण किती महत्वाचे आहे, ते केल्याने विकास होतो, असे सतत सांगून लोकांचा ब्रेन-वॉश केला गेला. ज्याची गरज नाही ती गोष्ट कशी गरजेची आहे हे जाहिराती जशा माणसाच्या मनावर बिम्बवतात, तशीच ही रस्ता रुंदीकरणाची बाब आहे. रस्ता रुंदीकरणाने कुणाचे काय भल झाल? गावच्या गाव उठली, शेती गेली, माणसाचे उद्योग संपले, वर्षानुवर्षे परिचयाची असलेली झाडे गेली आता पाण्याचे स्त्रोत जात आहेत.

जगण्यासाठी अत्यंत महत्वाची असते ती हवा. अन्न-पाण्या शिवाय माणूस काही दिवस राहू शकतो, परंतु हवे शिवाय तो काही मिनिटेच राहू शकेल. सुंदर, स्वच्छ, ऑक्सिजनने परिपूर्ण असलेली हवा झाडाभोवती व जंगलात जास्ती मिळते. त्यांच्याकडे प्रदूषण थोपविण्याची नैसर्गिक ताकद असते. एवढेच नव्हे तर ही पाण्याचाही संचय करतात. प्रत्येक मोठा वृक्ष म्हणजे पाण्याचे धरणच असते. जसे वरून झाडांचे जंगल बनते, तसे जमिनीच्या खाली मुळांचे जंगल बनलेले असते. फळ खाऊन पक्षी बिया टाकतात. त्या बियातून पुन्हा नवी झाडे तयार होतात. झाडे निर्माण करण्याचे काम पक्षी बिनबोभाट करीत असतात. ते सांगत नाहीत आमचे उद्दिष्ट्य अमुक एक कोटी झाडे लावण्याचे आहे म्हणून. बिया टाकायचे त्यांचे काम ती करतात व निसर्ग त्यांना वाढवितो. ह्या झाडांमुळे, जंगलांमुळे पाणी राहते. पक्षी-प्राण्यांना आसरा मिळतो. म्हणून पूर्वीच्या माणसांनी देवराया सांभाळल्या, जपल्या. ह्या सर्व नैसर्गिक स्त्रोताचा अभ्यास करायला हवा.

पण आपल्या कडे कोणतेही काम करताना, ह्यां सर्व महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जात नाही. झाडे तोडली गेल्यास त्याचे काय दुष्परिणाम होईल याचा विचारही केला जात नाही. त्याच बेफिकीर पणाने विहिरी बुजवल्या जात आहेत. झाडे गेल्यामुळे जमिनीतली पाण्याची साठवणूक संपली. ग्लोबल वॉर्मिंग मुळे पृथ्वीचे रुपांतर एका तप्त गोळ्यात होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि ही परिस्थिती आता गंभीर पातळीवर पोहचली आहे. माणूस अनेक तर्‍हेने ह्या उष्णतेत भर घालतो आहे. नको तितकी बांधकामे चालू आहेत, उष्णतेत भर घालणारे प्रकल्प येत आहेत. आणि विशेष म्हणजे तिला थंड करण्याचे सर्व उपाय नष्ट केले जात आहेत.

पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याची पातळी खाली-खाली जात चालली आहे. जवळ-जवळ ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कितीही खोल बोअर मारली तरी पाणी लागत नाही आणि अशा परिस्तिथीत पाण्याने भरलेल्या विहिरी, रस्त्याच्या आड येत आहेत त्या जाणारच त्यावर दुसरा कोणता उपाय नाही, असे सांगून विहिरीच्या मालकाला विहिरींचे पैसे देऊन त्या बुजविण्याचा घाट रस्ते बाधकाम विभाग करत आहे. विहिरी बुजवा दुसरीकडे खोदा असे सांगणार्‍यांना विचारावेसे वाटते की खरच पाण्याची एवढी विपुलता आहे का हो? पैसे घेणार्‍याना आज पैशाचे मोल वाटत आहे; पण जगण्यासाठी सर्वस्वी पैसा गरजेचा नसतो तर जगण्यासाठी इच्छा महत्वाची असते!

पाणी ही सजीवांची आत्यंतिक महत्वाची गरज आहे. जरा भविष्याचा विचार करा: दोन माणसे शेजारी रहातात. एकाची विहीर बाधित झाली पण त्याचे त्याला पैसे मिळाले, तर दुसर्याची विहीर वाचली. पैसे घेणार्‍याला कोठेही पाणी उपलब्ध झाले नाही. तो पाणी मागायला शेजार्‍याकडे गेला. सुरुवातीला तो त्याला पाणी देईलही, पण नंतर तो म्हणेल, तुला विहिरीचे पैसे मिळाले आहेत, तेव्हा तू तुझे बघ बाबा; मी तुला रोज पाणी नाही देणार! आणि मग भांडणे, मारामारी. त्याच्या पुढेही देखिल लोक जातील. ह्या गोष्टींचा कोणी विचार केला आहे का?

मी माहिती अधिकाराच्या अंतर्गत चार ही जिल्ह्यातील प्रांतांना त्यांच्या कार्यकक्षेतील किती विहिरी बाधित होत आहेत ह्या विषयीची माहिती विचारली होती. फक्त राजापूर प्रांत कार्यालयाने मला लांजा व राजापूर तालुक्यात ५२ विहिरी बाधित होत आहेत म्हणून सांगितलं. खेड मधून न उघडणारे संकेत स्थळ देऊन, तुम्ही शोधा असे सांगितले, तर चिपळूण मधून मी मागवलेलेच नसलेले ७७६ पानांचे रु. १५५२/- पाठवा असे सांगितले गेले. रत्नागिरी, कुडाळ, कणकवली यांचेकडून तर उत्तरच आले नाही!

एक हिशोब करा: एका जिल्ह्यातून, नव्हे फक्त दोन तालुक्यातल्या ५२ विहिरी बाधित होत असतील तर उरलेल्या पट्टयात हा आकडा चार अंकात सहज जाऊ शकतो! ही माहिती उजेडात आली तर काय होईल याची कल्पना आहे. म्हणून त्यांना ती द्यायचीच नाहीये. जे काही होत आहे ते चुकीचे आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आता लोकांची पाळी आहे. पाण्यावरून होणारा भीषण संग्राम अटळ आहे. तेव्हा बाधित होणार्‍या विहिरी वाचवा. शासन तुम्हाला उद्ध्वस्त करू पहाते आहे!

-डॉ मीनल कुष्टे

डॉ मीनल कुष्टे

(प्रस्तुत लेखिका या निसर्ग उपचार तज्ञ असून पर्यावरणाच्या अभ्यासक आहेत. दैनंदिन घडामोडींवर मग त्या राजकीय असोत, सामाजिक अथवा पर्यावरणीय असोत त्यावर त्या आपले विचार प्रखरतेने मांडत असतात. )

Add Comment

Protected Content