ईडी व सीबीआयला चीन व पाकची सुपारी द्या – शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. यामुळे त्यांना पाक व चीनची सुपारी देऊन टाका अशा शब्दात आज शिवसेनेने तपास यंत्रणांच्या गैरवापरावर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला आहे व तो त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवायचे हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे. शेतकर्‍यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. खून, हत्या करण्याचे प्रयत्न असे आरोप आहेत. त्याच वेळी वृद्ध-जर्जर अशा अन्नदात्या शेतकर्‍यांवर काठ्या उगारतानाचे, त्यांना रक्तबंबाळ करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे पाहून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा अहमदाबादेत खरेच अश्रू ढाळत असेल. तेही सरदारच होते. शीख बांधवांनाही सरदार म्हणूनच संबोधले जाते. सरदारांवर अन्याय तेव्हाही झाला व आजही होतच आहे. इकडे आपल्याच शेतकर्‍यांना दिल्लीत घुसू दिले जात नाही आणि तिकडे सीमेवर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसले व ठाण मांडून बसले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, श्रीनगर, कश्मीर खो़र्‍यात जवानांची बलिदाने सुरूच आहेत. देशासाठी बलिदान देणे, त्याग करणे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपराच आहे, पण राज्यकर्ते असे किती बळी व बलिदाने देणार आहेत? महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही? लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. तेव्हा या यंत्रणांना चीन आणि पाकिस्तानचीही सुपारी द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कदाचित चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील. बहुधा लडाखमध्ये घुसलेले चिनीही शरण येतील व पाकडेही पीओके सोडून पसार होतील.

यात शेवटी म्हटले आहे की, विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा एकंदर विद्यमान राज्यकर्त्यांचा समज दिसत आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकर्‍यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही असा सल्ला यात देण्यात आला आहे.

Protected Content