अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जितेश ने कठीण परिस्थितीवर मात करीत अभ्यासू वृत्ती व मेहनतीचा जोरावर केंद्रीय सैन्य दलात आपला ठसा उमटविला आहे. कळमसरे येथील रहिवासी सुभाष परदेशी यांचा लहान मुलगा जितेश सुभाष परदेशी याची नुकतीच स्टाप सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या एसएससी जीडी 2024 परीक्षेत 160 पैकी 145.54 गुण मिळवत (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सैन्य दलात) सीआयएसएफ या दलात निवड झाली आहे.यामुळे जितेशच्या मित्रपरिवाराने त्याची डीजे लावून संपूर्ण गावभर खांद्यावर घेऊन जल्लोषात मिरवणूक काढली.
एवढेच नव्हे तर शिवजयंती उत्सव समिती तसेच माऊली परिवार व जिवलग मित्रांनी डीजे साठी वर्गणी गोळा करून जितेश ची केंद्रीय औद्योगिक सैन्य दलात निवड झाली म्हणून त्याचा निवडीचा मनसोक्त नाचून आनंद साजरा केला. यावेळी जितेशला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला होता.जितेशने नुकतेच अभियांत्रिकी (मॅकेनिकल-इंजिनिअरिंग) चे शिक्षण पुर्ण केले आहे. त्याचे वडील सुभाष परदेशी हे कळमसरे गावात एक लहानशे कृषी केंद्र चालवतात. याच ठिकाणी वडिलांना कामात मदत करीत अभ्यास,कठीण परिश्रम व मेहनतीचा बळावर त्याने हे यश मिळवले आहे. अवघ्या 23 व्या वर्षी जितेश ची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जितेशची केंद्रीय औद्योगिक सैन्य दलातील निवड ही युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.