पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सारंगखेडा येथे नुकतेच चेतक फेस्टिवल राष्ट्रीय चित्र व शिल्प प्रदर्शनात पाचोरा येथील दिव्या जैन हिच्या चित्राची ज्यूरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अंतिमफेरी व चित्रप्रदर्शनासाठी देशभरातील २५० चित्रांची निवड करण्यात आली आहे.
सारंगखेडा येथे यात्रेत दरवर्षी घोड्यांचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. याठिकाणी चेतक फेस्टिवल राष्ट्रीय चित्र व शिल्प प्रदर्शन भरविण्यात येते. भारतातून २० राज्यातून ८०० चित्रांचा सहभाग होतो. त्यापैकी अंतिमफेरी साठी व चित्रप्रदर्शनासाठी २५० चित्रांची निवड केली जाते. त्यातून चित्रांची निवड पुरस्कारासाठी काढली जातात. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथील प्रा. गोपाल शेपाळ, नागपूरचे प्रा. हेमंत सूर्यवंशी हे होते.
पाचोरा येथील रंगश्री आर्ट फाउंडेशनची विदयार्थीनी कु. दिव्या राहुल जैन हिच्या चित्राची ज्यूरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ५ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात येणार आहे. चित्राचा विषय “घोड्यांचे इतिहासातील स्थान” हा होता. याविषयासाठी दिव्याने वारली चित्रकलेचा वापर केला आहे. यात तिने तिच्या कल्पकतेने इतिहासातील घोड्यांचे कुठे कुठे महत्व आहे हे शोधले. रामायणातील लव – कुश यांनी अडवलेला घोडा, महाभारतातील भगवदगीता सांगितलेला प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज यांची आगऱ्याहून सुटका, महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याने मारलेली उंच उडी व शत्रुंना गाफील ठेवण्यासाठी घोड्याला हत्तीचा मुखवटा, झाशीची राणीची लढाई असे अभ्यासपूर्वक विषय मांडले आहे. पाचोऱ्यातील दुल्हन एम्पोरियम चे संचालक राहुल जैन यांची ती कन्या आहे. दिव्या हिस श्री. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक सुबोध कांतायन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.