चंदीगड ( प्रतिनिधी ) माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. सेहवागने हरयाणाच्या रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली होती. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दल सेहवागशी संवाद साधण्याची आणि त्याला तिकिटाची ऑफर देण्याची जबाबदारी घेतली होती. परंतु निवडणूक लढवण्यास सेहवागचा नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सेहवागला तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. यावर सेहवागने नुकतेच भाष्य केले आहे, मी राजकारणात येणार, ही निव्वळ अफवा असल्याचे सेहवागने म्हटले आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे सेहवागने ट्विट केले आहे. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ट्विटमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेखही त्याने केला आहे. ‘गेल्या निवडणुकीवेळीही अशीच चर्चा झाली होती, मात्र तसे काही घडले नाही. आताही तशीच चर्चा सुरू आहे, मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. मला निवडणूक लढवण्यात रस नाही. त्यामुळे तो विषय संपला आहे,’ असेही सेहवागने पुढे स्पष्ट केले आहे.