मुंबई प्रतिनिधी । प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा देऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीने बैठक सुरू केली असून यात किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांनी राजकीय घडामोडींच्या प्रत्येक घडामोडीचे वार्तांकन केले आहे. यात इलेक्ट्रॉनिक मीडियाने अनेकदा उथळपणा केला. ब्रेकींगच्या नादात अनेकदा सर्रास चुकीच्या बातम्या दिल्या. यामुळे नेते मीडियाला कंटाळून गेल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांना अतिशय जबरदस्त असा चकवा दिला.
यात पहिल्यांदा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून अजित पवार झपाट्याने बाहेर पडले. त्यांनी आजची मिटींग रद्द झाली असून आपण बारामतीला निघाल्याचे जाहीर केले. यामुळे अजित पवार यांच्या नाराजीची ब्रेकींग न्यूज बनली. तर शरद पवार यांनी लागलीच बाहेर येऊन अजित पवार हे मुंबईतच असल्याचे सांगितल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली. याप्रसंगी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या आततायीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सारे नाटक सुरू असतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण अजितदादांसह मुंबईतच असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक सुरू झाल्याचे दोन वृत्त वाहिन्यांना फोन करून कळविल्याने सर्वांना धक्का बसला. तर थोड्याच वेळात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले. यात अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलीक, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त आले तोपर्यंत ही बैठक सुरू होती.