जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सकाळी दुध फेडरेशनच्या रोडवर अपघातात एकाचा प्राण गेल्यानंतर रात्री पुन्हा याच परिसरात एक अपघात झाल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज सकाळी दुध फेडरेशनच्या नजीक भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात घडला. यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने मागून धडक दिली. यात अंकुश भील या तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. या भागात उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थीनी बसलेल्या असतांना त्यांच्यापासून अगदी काही फुटांवर हा भीषण अपघात झाला. सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. दरम्यान, या अपघातामुळे सदर भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या रोडवरून अवजड वाहनांनी वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
दरम्यान, सकाळच्या अपघातामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज रात्री पुन्हा याच भागात अपघात झाला. आज सकाळचा अपघात भाग्यश्री पेट्रोल पंपाच्या समोर झाला होता. तर रात्री नऊच्या सुमारास येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मकरा टॉवरजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या बुलेटने या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. यात तो व्यक्ती जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. यात एमएच 19 ईएन 6780 या क्रमांकाच्या बुलेटस्वाराने पायी चालणाऱ्या व्यक्तीला उडविले. यानंतर न थांबता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात त्याने एका रिक्षाला देखील धडक दिली. मात्र लोकांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दुध फेडरेशन पासून दोन बुलेटस्वारांनी रेस लावली होती. भरधाव वेगाने ते रेल्वे उड्डाण पुलाकडे निघाले असतांना यातील एका स्वाराने पादचाऱ्याला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाले. या मयताचे नाव सिकंदर दिलावर पठाण ( वय 56, रा. राजीव नगर, जळगाव ) हे असल्याचे समजते.
या संदर्भात शेवटची माहिती मिळाली तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आज लागोपाठ दोन अपघात घडल्याने या भागातील नागरिकांनी पुन्हा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत आलेल्या माहितीनुसार बुलेटस्वाराने धडक दिलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे.