जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या सेन्ट्रल फुले व महात्म फुले मार्केटमधील मुदत संपलेल्या परंतु थकबाकीची कोणतीही रक्कम न भरलेल्या १७ दुकानांना सील करण्याची कारवाई मनपा पथकातर्फे आज गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
सेन्ट्रल फुले व फुले मार्केटमधील गाळे सील करण्याची कारवाई दोन पथकाद्वारे आज करण्यात आली. सर्वप्रथम यादोन्ही पथकांनी सेन्ट्रल फुले मार्केटमधील १६ दुकाने उपयुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सील केले. यात सेन्ट्रल फुले मार्केट मधील दुकान नंबर ४६ ते ४९ या चार दुकानांचे एकच दुकान केल्याचा प्रकार उघडकीस आला. तर फुले मार्केट मधील ओम हॅन्डलूम हाउसला सील करण्यासाठी पथक गेले असता या दुकानात व्यवहार सुरु असल्याचे आढळून आले. दुकानांमध्ये विक्रीसाठी आणलेला मालासह दुकान सील करण्यात आले. दरम्यान, दुकानदाराने त्याच्याकडे स्टे असल्याने त्याच्या दुकानाला सील करता येणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी उपायुक्त डॉ. गुट्टे यांनी स्टे ऑर्डर संबंधित दुकानदाराला दाखविण्यास सांगितले मात्र दुकानदार स्टे ऑर्डर दाखवू शकला नाही. यानंतर हे दुकान देखील सील करण्यात आले. ही कारवाई मनपाचे प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, किरकोळ विभागाचे नरेंद्र चौधरी, अतिक्रमण विभागाचे एच. एम. खान व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.