मुंबई प्रतिनिधी । तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील २२ जिल्ह्यांमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले असून यासाठी अनेक नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. यानंतर अलीकडेच कॉलेज सुरू करण्यात आले असले तरी प्राथमिक, माध्यमीक व उच्च माध्यमीक शाळा अद्याप बंदच होत्या. या पार्श्वभूमिवर, आजपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी अनेक जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांमधील वाढता संसर्ग पाहता, शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. या अनुषंगाने आजपासून २२ जिल्ह्यांमधील शाळा सुरू झाल्या आहेत.
आज जिथे शाळा सुरू झाल्यात तिथे विद्यार्थी व शिक्षकांना योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना मास्क शिवाय प्रवेश देण्यात येत नाही. शाळेत येतांना फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्यात येत आहे. ऑक्सीमीटरचे ऑक्सीजनची तपासणी करून व सॅनिटायझेशन करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तर शाळेत एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मात्र शाळा अद्यापही बंदच आहेत. जिल्हा प्रशासनाने कालच ७ डिसेंबर नंतरच शाळा उघडतील असे निर्देश जारी केले आहेत. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.