पंतप्रधानांची उद्या तातडीची बैठक; लॉकडाऊनवर होणार चर्चा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमिवर पंतप्रधान मोदी यांनी उद्या तातडीची बैठक बोलावली असून यात काही राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा होणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. उद्या याबाबत दोन बैठका होणार आहेत.

पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे नव्याने रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील. यात काही राज्यांमध्ये करोना संकट नव्याने उभं राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करोना लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत व तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे.

Protected Content