धक्कादायक : ५० बड्या कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज माफ !

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीसह अनेक बड्या उद्योगजकांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आले आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यानुसार ५० मोठ्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे समोर आली आहे. आरबीआयने गोखले यांना दिलेल्या उत्तरात सांगितले आहे की, ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेची थकबाकी तसेच राइट ऑफ रक्कमेचा समावेश आहे. या ५० कर्जबुडव्यांच्या यादीत चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण ५ हजार ४९२ कोटींचे माफ केलेले सर्वात मोठे कर्ज आहे. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आरआयई अ‍ॅग्रो लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. तिसऱ्या नंबरवर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी या कंपनीचा समावेश असून कंपनीने ४ हजार ७६ कोटींचे कर्ज घेतले होते.

दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्याच्या यादीमध्ये कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीने २ हजार ८५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदूर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत १८ कंपन्यांची १ हजार कोटी कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यात हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या २५ कंपन्यांची यादी आहे.

Protected Content