बेरोजगार तरूणाला नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका बेरोजगार तरूणाला नोकरी देण्याचे आमिष दाखवत तब्बल ९ लाख ८६ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात २६ वर्षीय तरूण हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो सध्या बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी त्याला भाषा मुखर्जी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मेलवरून तसेच मोबाईल वरून संपर्क साधून नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चांगली नोकरी लावून देतो असे सांगून तरूणाकडून वेळोवेळी तब्बल ९ लाख ८६ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने थेट जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे करीत आहे.

Protected Content