नवी दिल्ली प्रतिनिधी । देशातील भारतीय स्टेट बँक त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी एक नवीन ऑफर देणार आहे. जुन्या कर्जधारकांनी याचा फायदा होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, एसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. बँक जुन्या ग्राहकांना रेपो लिंक्ड लेंडिंग रेटवर कर्ज देऊ शकते. बँकेला आशा आहे की, सरकार सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपाय करत असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल. देशातील मोठ्या बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली होती. याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 5.40 टक्के असून एसबीआय त्यावर 2.25 टक्के वाढवून लेंडिंग रेट 7.65 एवढा होतो. यावर RLLR वर 40 बेसिस पॉईंट आणि 55 बीपीएस स्प्रेड लावला जातो. यामुळे नव्या कर्जदारांना 8.05 ते 8.20 टक्क्यांच्या दराने गृहकर्ज मिळू शकते. सध्या बँक 75 लाखांपर्यंतचे कर्ज 8.35 ते 8.90 टक्के दराने देते. यातून बँकेच्या नव्या ग्राहकांना व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळत होता. यामुळे जुन्या ग्राहकांनाही व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळवून देण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.