जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगरातील लाकुडपेठ परिसरातील अंबिका सॉमीलचे कार्यालयाचे कूलूप तोडून ३५ हजार रूपयाचे साहित्य चोरून नेल्याची घटना गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, नारायण परबत पटेल वय ६० रा. लाकूड पेठ, शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे लाकूडपेठ येथे अंबिका सॉमील आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सॉमीलचे कार्यालयाचे कुलूप तोडून ३५ हजार रूपये किंमतीचे लाकूड कापण्याचे मशीन, लोखंडी सामान, ब्लोअर व इतर साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नारायण पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोन निकुंभ हे करीत आहे.