ऊसतोड कामगारांकडून दोन भावांना बेदम मारहाण; ५ जणांवर गुन्हा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा येथील भिलाटी भागात राहणाऱ्या उसतोड कामगारांनी दोन भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश शालीकराम मालचे वय-४५ रा. निशाणे ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतातील उस काढण्यासाठी धरणगाव तालुक्यातील साळवा गावानजीकच्या भिलाटी वस्तीतील कामागारांना अडव्हॉन्स पैसे दिले होते. दरम्यान, सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रमेश मालचे व त्याचा मोठा भाऊ सुधाकर मालचे हे साळवा येथील भिलाटी वस्तीत गेले.

दसरा नंतर तुम्हाला कामावर जायचे आहे असे सुधाकर मालचे यांनी सांगितले. याचा राग आल्याने प्रकाश बुधा भिल, शशीकांत बुधा भिल, शंकर जामा भिल, रोहिदास दौलत भील, बुधा सदा भिल रा. साळबाव ता. धरणगाव यांनी दोन्ही भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रमेश मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद करीत आहे.

Protected Content