सावित्रीमाईंनी स्त्रियांच्या निष्प्राण जगण्याला नवचैतन्य देऊन आत्मसन्मान वाढविला : ॲड. देवेश्री बुंदेले – तांबट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ”क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांच्या निष्प्राण जगण्याला नवचैतन्य देऊन आत्मसन्मान वाढविला” असे प्रतिपादन ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले – तांबट यांनी केले.सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे संयुक्तपणे जळगाव येथील वात्सल्यसिंधु असावा नगरला उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज नाले ( अध्यक्ष,जनमत प्रतिष्ठान ) तर प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कलाशिक्षक सुनील दाभाडे (अध्यक्ष, द्वारकाई प्रतिष्ठान ) विशाल तांबट,नकुल भदादे,सोनाली भदादे मॅडम मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्रीमती सिंधू सुतार यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.महात्मा फुले लिखित प्रार्थनेच्या समुह गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे मार्गदर्शनात म्हणाले की, ’ सावित्री माता अतूट अन् निर्भय धैर्याचा महामेरु अन् करुणेचा महासागर होत्या ’ पुढील मार्गदर्शनात लुल्हे यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक साकारण्याचा प्रेरणादायी यशस्वी लढ्याचा इतिहास संक्षेपाने सांगितला तसेच सावित्रीमाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुली व दीन दलितांना शिक्षण देण्यासाठी केलेले अग्निदिव्य व बालहत्या प्रतिबंध, अनाथ आश्रम, विधवा पुनर्विवाह, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन या सामाजिक कार्यात केलेला अजोड संघर्षातील त्याग ,सेवा,आत्मसमर्पणशील प्रेरणादायी मूल्यात्मक प्रसंग सांगितले.

अमृत महोत्सवी वाढदिवसाप्रित्यर्थ मातोश्री सिंधू सुतार यांचा भावपूर्ण सत्कार

संकल्पित अण्णासो.सुपडू सुतार बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सिंधू सुतार यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने जळगाव येथील द्वारकाई प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष सुनिल दाभाडे यांच्यातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी मातोश्री श्रीमती सिंधु सुतार यांचे समीक्षा लुल्हे व देवश्री बुंदेले – तांबट यांनी औक्षण केले.सुपुत्र विजय लुल्हे यांनीही औक्षण / सत्कार करून आशीर्वाद घेतले आणि निरामय निरोगी दीर्घायुष्य मिळो ही निर्मिका चरणी प्रार्थना केली.समीक्षा लुल्हे व देवश्री बुंदेले यांनी सामूहिक ’ तयास मानव म्हणावे का ? ’ ही सावित्रीमाई फुले लिखित आशय संपन्न कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कलाशिक्षक दाभाडे यांचा सत्कार

शांती फाउंडेशन गोंडा,उत्तर प्रदेश संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले सन्मान २०२४ प्राप्त झाल्याबद्दल कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा सत्यशोधक समाज संघातर्फे विजय लुल्हे यांच्या हस्ते व जनमत प्रतिष्ठान तर्फे संस्थाध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्यातर्फे ग्रंथदान व दिनदर्शिका भेट उपक्रम

विविध संस्थांना सन्मानपूर्वक दर्जेदार व वाचनीय पुस्तकांचे ग्रंथदान ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांनी दिले.ग्रंथदान उपक्रमांतर्गत जळगाव येथील मराठी प्रतिष्ठानच्या आवाहनानुसार विद्यादान ( ग्रंथदान ) चळवळीसाठी संस्थाध्यक्ष जमील देशपांडे यांच्याकडे सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी १५०० रुपयांची दर्जेदार ग्रंथसंपदा सुपूर्द केली. कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी मुक्ता व रौनक भदादे यांना सावित्रीमाई जीवन चरित्रात्मक पुस्तके जयश्री बुंदेले यांच्या हस्ते देण्यात आले.सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका २०२४ कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांना विजय लुल्हे व मातोश्री सिंधु सुतार यांच्या हस्ते सादर भेट देण्यात आल्या.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीक्षा लुल्हे यांनी केले कार्यक्रमाचे प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे तसेच पुस्तक भिशीचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्तंभ साहित्यिक तथा माजी शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) शशिकांत हिंगोणेकर व निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी अप्पासाहेब निळकंठ गायकवाड , माजी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,सुवर्णा लुल्हे यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कार्यकर्ते रवींद्र तितरे , सुरेश सपकाळे, योगेश कोलते यांनी अमूल्य परिश्रम घेतले.

Protected Content