सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी | येथील येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो-उर्दू स्कूलमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणातील संशयित तत्कालीन शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकार्यांसह तिघांना न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे. तर इतरांचा मात्र अजूनही थांगपत्ता लागलेला नसल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती करण्यात आल्या प्रकरणी संस्था चालकांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शे.सुपडू शे.रशीद मंसुरी, शे.हनीफ शे.रशीद मंसुरी, सगिर दगडू बागवान, मुक्तार अली कादरअली, लुकमान खान गुलशेर खान, शे.रफिक शे.गुलाब, दानिश सगिर बागवान, शेख सलीम अहमद शे.सुपडू पिंजारी, शे.जब्बार सलीम कुरेशी, तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक भास्कर जे.पाटील, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी देवांग (पूर्ण नाव माहीत नाही); सगीर दगडू बागवान (मयत), मुख्तारअली कादरअली व लुकमान खान गुलशेर खान आदींचा संशयितांमध्ये समावेश आहे.
दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी शे.हनीफ शे.रशीद मंसुरी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची जळगावच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील संशयित तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी डॉ. देवांग आणि शेख जब्बार शेख कुरेशी यांनी जामीनासाठी जळगाव येथील न्यायालयात धाव घेतली होती. या तिघांना न्यायालयाने २५ मे पर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला असल्याची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजला पोलीस उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास सपोनि डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय समाधान गायकवाड करत आहेत. यात अनेक बड्या मंडळीचा समावेश असल्यामुळे या खटल्याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे.