सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात काल रात्री जमावाने केलेल्या गाड्यांच्या तोडफोडी प्रकरणी जमावाविरूध्द तर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा येथे काल रात्री दहाच्या सुमारास जमावाने धुडगुस घालत चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची तोडफोड केली होती. सोशल मीडियातील एका पोस्टचा निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाणार्या जमावाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. पोलिसांनी काल रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन वातावरण नियंत्रणात आणले होते.
दरम्यान, या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिली फिर्याद पोलीस कर्मचारी यशवंत टहाकळे यांनी दिली आहे. यात म्हटले आहे की, काल दि.२९/१०/२०२२ रोजी रात्री २०.०० वाजेचे सुमारास सावदा शहरातील राहणारे इसमाने एखा समाजाच्या धर्मगुरु यांचे संदर्भात मोबाईलवर काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट केलेली असल्याचे संशयावरुन मुस्लीम धर्माचे अंदाजे १५० ते २०० लोक हे रात्री २१.४५ सावदा पोलीस स्टेशन येथे आलेले होते. त्यावेळी जमावातील लोकांशी सपोनि डी. डी. इंगोले हे वार्तालाप करत असतांना सैय्यद असलम सैय्यद लाल याने जमावातील लोकांना चिथावणी दिली. यामुळे जमावातील शेख साबीर शेख खलील उर्फ अल्लारख्खा, शेख फरदीन शेख इकबाल, शेख समीर शेख रफीक, शेख वाजीद शेख साबीर, फारुक हाफीज पहेलवान, हसन मुस्तफा वेल्डींगवाला, बबलु खाटीक, शेख सुलतान शेख उस्मान तसेच त्यांचे सोबत अंदाजे ३० ते ३५ लोक हे पोलीस स्टेशनचे आवारातुन सैय्यद असलम सैय्यद लाल याचे सोबत सावदा शहरात आरडा ओरड करीत गर्दी करुन एकत्रीत निघाले.
या जमावाने गावातुन जात असतांना रस्त्यात दिसणार्या वाहनांची दगडफेक करुन नासधुस केली, तसेच रोडवरील इले.पोलवरील सार्व.लाईट या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. दरम्यान, सपोनि इंगोले, पोउपनि.गायकवाड, सफौ. तडवी, सफौ. शाह, पोना. पाटील, पोना पठाण; पोना. मजहर पठाण, पोका. कुरकुरे, पोका. तडवी,पोका. दामोदर व इतर पोलीस स्टाफ अशांनी जमावास प्रतीबंध करुन जमाव हाकलुन लावला व परीस्थीती नियंत्रणात आणली. यात चार चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
या प्रकरणी सैय्यद असलम सैय्यद लाल, शेख साबीर शेख खलील उर्फ अल्लारख्खा, शेख समीर शेख रफीक, शेख वाजीद शेख साबीर, फारुक हाफीज पहेलवान, हसन मुस्तफा वेल्डींगवाला, बबलु खाटीक, शेख सुलतान शेख उस्मान, शेख फरदीन शेख इकबाल तसेच त्यांचे सोबत अंदाजे ३० ते ३५ लोक यांच्या विरुद्ध भादंवि कलम १५३,१४३, १४७, १४९, ३३७ सह पब्लीक प्रॉपर्टी ऍक्ट कलम-३, सह महा. पोलीस अधिनीयम १९५९ चे कलम ३७ (१) (३) / १३५, ११२,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच प्रकरणी नंतर गुलाम फरीद शेख यांनी फिर्याद दाखल केली. यात म्हटले आहे की, शहरातील साहील राजू भंगाळे या तरूणाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामुळे आपल्या धर्माचा अवमान झाला असून आपल्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार साहील राजू भंगाळे याच्या विरोधात भादंवि कलम २९५-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.