सावद्यात भाजप शहराध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | येथे काल रात्री जमावाने भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे आणि इतरांवर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याचे अतिशय तीव्र पडसाद उमटले असून रात्री उशीरापर्यंत जमावाने आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या संदर्भात वृत्त असे की, काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना कत्तलखान्याजवळ काही मुलांना जमाव मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यामुळे ते आपल्या दुचाकीवरून तेथे नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी गेले. याप्रसंगी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी यांच्यासह सुमारे ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला चढविला.

यात जमावाने जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर लाठ्या-काठ्या आणि तलवारीने हल्ला चढविला. यात त्यांना पिस्तुल दाखवून धमकावण्यात आले. तसेच पिस्तुलीच्या दस्त्याने त्यांना मारहाण झाली. दरम्यान, शहरात ही माहिती मिळताच मोठा जमाव तेथे आला. पोलिसांनी देखील तिथे धाव घेतली. या हल्ल्यात जितेंद्र भारंबे यांच्यासह गणेश देवकर, पंकज चौधरी, पवन महाजन व राहूल पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील जितेंद्र भारंबे यांना जास्त जखमा झाल्या आहेत.

जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर जमावाने हल्ला चढविल्याची माहिती मिळताच काल रात्री अकराच्या सुमारास सावदा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी या तिघांना अटक केली असून त्यांच्यासह इतरांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच आर्म ऍक्ट ३/२५ व ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांनी सावदा येथे भेट दिली. येथे अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. नागरिकांनी संयम दाखविल्याने रात्रीच वातावरण निवळले. मात्र हा सर्व प्रकार गुरांच्या तस्करीला विरोध केल्यातून घडल्याचे समजते.

Protected Content