सत्यशोधक समाज म्हणजे मानवमुक्तीची चळवळ – प्रा. डॉ. अनिल क्षीरसागर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सत्यशोधक समाज म्हणजे एक असा समाज ज्याचं अधिष्ठान सार्वजनिक शिक्षणावर आधारलेलं असेल, जो विचारशील आणि स्वावलंबी असेल ज्यात वर्गभेद नसेल, स्त्री दास्य नसेल ज्यात कर्मकांड नसेल. परमेश्वराची प्रार्थना करतांना, आराधना करतांना मध्यस्थांची गरज नसेल, तो जगण्यामधील सत्यासत्यता स्वतः तपासून पाहू शकेल, शिक्षणातून ती क्षमता त्या समाजात आलेली असेल. असे प्रतिपादन प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

के.सी.ई. सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे कला मंडळाच्या वतीने सत्यशोधक समाजाचा दिडशेवा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर (सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग मू.जे. महाविद्यालय) प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात पुढे असे प्रतिपादन केले की, व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरण सत्यशोधक समाजाने दिले. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला थारा न देता सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. के.जी. सपकाळे (उपप्राचार्या) होत्या. प्रा.आर.बी. ठाकरे (पर्यवेक्षक), तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अतुल इंगळे (अध्यक्ष कला मंडळ), सूत्रसंचालन प्रा.ज्योती मोरे, वक्त्यांचा परिचय प्रा.ईशा वडोदकर तर आभार प्रदर्शन प्रा.ललीत शिंपी यांनी केले. प्रा.रुपम निळे, प्रा.विजय भोई, प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.उमेश ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

 

Protected Content