वाळू व्यावसायिकांकडून सरपंचला बेदम मारहाण

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतूकीवर कारवाई व्हावी म्हणून मंडळाधिकारी यांना फोन केल्याच्या संशयावरून आव्हाणी गावातील सरपंचला वाळू व्यवसाय करणाऱ्या पाच जणांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता आव्हाणी गावातील गिरणा नदीपात्रात घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. यावल धरणगाव महसूल विभाग वारंवार कारवाई करत आहे. दरम्यान, आव्हाणी गावातील सरपंच जानकीराम दामोदर पाटील (वय-५५ ) हेच महसूल विभागचे मंडळाधिकारी यांना माहिती देत असल्याचा संशयातून वाळू व्यवसाय करणारे अक्षय पाटील, मुकुंद नन्नवरे रा. पाळधी ता. धरणगाव यांच्यासह इतर तीन जणांनी गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता गिरणा नदी पात्रात सरपंच जानकीराम पाटील यांना शिवीगाळा करत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच तुला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सरपंच जानकीराम पाटील यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे अक्षय पाटील, मुकुंद नन्नवरे यांच्यासह इतर तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.

Protected Content