कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

जळगाव प्रतिनिधी । कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-0257-2217193/2223180, ई-मेल- [email protected] असा आहे.

तक्रार निवारणासाठी समिती स्थापन

‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला सानुग्रह अनुदानाबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र अशा दोन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत.  जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती ही महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक हे राहतील. तसेच महानगरपालिका क्षेत्राकरीताही तक्रार निवारण समिती राहील. ही समिती मनपा प्रशासकीय क्षेत्रनिहाय असून या समितीचे अध्यक्ष हे मनपा उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील तर मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य सचिव असतील. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

 

Protected Content