मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काल विधानसभेत आ. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या घणाघाती भाषणात संजय राऊत यांच्यासह उध्दव ठाकरेंभोवतीच्या कोंडाळ्यावर टिकास्त्र सोडले होते. याला आज खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काल एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर विधानसभेत माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी थेट उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर उध्दवजींच्या भोवती असलेल्या कोंडाळ्याने शिवसेनेवर ही अवस्था ओढवल्याचे ते म्हणाले. ही चौकडी जोवर दूर होत नाही तोवर शिवसेना पूर्वपदावर येणार नसल्याची प्रखर टीका त्यांनी केली होती.
यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत म्हणाले, बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत.
उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणार्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा, असं संजय राऊत यांनी म्हटले. यातून त्यांनी आ. गुलाबराव पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले आहे.