मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुषमा अंधारे यांनी अलीकडच्या काळात पक्षाची बाजू सांभाळतांना दाखविलेल्या लढवय्येपणाचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी शिवसेनेतील फुटीनंतर भक्कमपणे पक्षाची बाजू मांडल्याबद्दल संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांचे दिलखुलासपणे कौतुक केले आहे. अंधारे यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आजच्या भेटीवेळी मी राऊतसाहेबांना म्हटलं, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीने खिंड लढवली. फार मोठे काही केलं नाही. त्यावर राऊत साहेब उत्तरले, ही खिंड निकराने लढलात, त्यामुळे ती पावनखिंड झाली,’ असं राऊत यांनी म्हटल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं.
अंधारे पुढे म्हणाल्या की, बर्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या. राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे. थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद १० पटीने वाढली आहे,’ असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.