मोठी बातमी : खा. संजय राऊत कारागृहातून बाहेर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले आहेत.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. पत्रा चाळ घोटाळ्यातील संशयित म्हणून त्यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली होती. १०० दिवसांपासून ते कारागृहात होते. न्यायालयाने त्यांच्या जामीनावर निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीने न्यायालयाच्या या निकालाला स्थगिती मिळावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. यावर आजच सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाने जामीनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यानंतर ऑर्थर रोड कारागृहात रिलीज ऑर्डर पाठविण्यात आली. तर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खासदार संजय राऊत हे कारागृहाच्या बाहेर आले.

खासदार संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करून ते मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, कारागृहाच्या बाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, संजय राऊत यांची प्रकृती खराब असल्याने ते रूग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: