ज्यांच्याकडे लपविण्यासारखे असते ते घाबरून भाजपमध्ये जातात- राऊत

मुंबई प्रतिनिधी । ज्यांच्याकडे लपविण्यासारखे असते ते घाबरून भाजपमध्ये जातात असा टोला मारत आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली असून त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांनाही काही काम हवं, त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचं काम करावं लागत आहे. ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

राऊत पुढे म्हणाले की,
आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सरकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जात आहे, मात्र मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
,
दरम्यान, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी सांगितले.

Protected Content