सावित्रीजोती मालिका बंद पडणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे अध:पतन: राऊत

मुंबई प्रतिनिधी । टिआरपी नाही म्हणून सावित्रीजोती मालिका बंद पडणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे अध:पतन असल्याचे नमूद करत ज्यांनी आपल्याला घडविले व उभे केले त्यांच्याविषयी समाज कृतज्ञ का नाही? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज विचारला आहे. आपल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी या विषयावर भाष्य केले आहे.

आपल्या रोखठोक या स्तंभात संजय राऊत यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र घडविणार्‍या आणि समाजाला दिशा देणार्‍या थोर पुरुषांचे नव्या पिढीस विस्मरण झाले आहे. फुले, आंबेडकर, शाहूंचा महाराष्ट्र असे आपण नेहमी म्हणतो. पण या तिन्ही पुढार्‍यांचा वापर आता फक्त निवडणुकीपुरता होतो. तसे नसते तर महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सावित्रीजोती ही मालिका बंद करावी लागली नसती. महात्मा फुले, सावित्रीबाईंचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. महिला वर्गावर तर प्रचंड उपकार आहेत. पंजाबात शेतकऱयांचा आक्रोश सरकारविरुद्ध पेटला आहे. पण ब्रिटिश राजपुत्राचा श्रीमंती थाट उतरविण्यासाठी हिंदुस्थानातील शेतकऱयांची दैन्यावस्था दाखविण्यासाठी फाटक्या वस्त्रात, जोतिराव राजपुत्राच्या दरबारात पोहोचले. त्यांनी शेतकऱयांचे दुःख वेशीवर टांगले. त्या जोतिरावांच्या मालिकेस महाराष्ट्रात प्रेक्षक नाही. टीआरपी नाही म्हणून ती बंद करावी लागते. हे दुर्दैव कोणाचे? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

यात राऊत पुढे म्हणतात की, आज प्रेक्षकांचा छोटया पडद्यावर सासूने सुनेचा केलेला छळ पाहण्यास जास्त कल आहे. कट, कपट, कारस्थान, स्वैराचार, घरभेदीपणा अशा गोष्टी असलेल्या मालिकांना तुफान लोकप्रियता मिळते. त्यांचे टीआरपी वाढत जातात. पण जोतिराव, सावित्रीबाईंना प्रेक्षक वर्ग नाही. त्यांच्या नावाने शिक्षणाच्या सवलती, आरक्षणाचे लाभ घेणा़र्‍यांनी तरी थोडी कृतज्ञता बाळगायला हवी. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे. दादरच्या इंदू मिलमध्ये १४ एकरांत डॉ. आंबेडकरांचे स्मारक होणार आहे. पण महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले यांची मालिका बंद पडली, ही वेदनाही कुणाच्या मनात जाणवत नाही!

मुलींसाठी पहिली शाळा काढणारे, त्यासाठी आपला वाडा देणारे, दलितांसाठी आपल्या वाड्यातील विहीर खुली करणारे फुले दाम्पत्य आपल्याला प्रिय नाही! पुरोगामी महाराष्ट्राचे हे अधःपतन आहे! जोतिबांमुळेच नवा महाराष्ट्र जन्माला आला. जोतिबांनी ज्या समाजाला जागृत केले, माणूस बनविले त्या बहुजन समाजाचे प्रतिनिधी नव्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. जोतिबा-सावित्रीबाईंचा जीवनपट म्हणजे हास्यजत्रा, लाफ्टर चॅलेंजचा प्रकार नाही. या जीवनपटात त्याग, संघर्ष व बलिदान याची किनार आहे. या मालिकेचे काही भाग मी पाहिले. कसदार लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण व उत्तम अभिनय कलाकारांनी केलाय. जिवंत असताना फुले दाम्पत्यावर कर्मठ लोकांनी दगड मारले. त्यातूनही ते उभे राहिले. ते ब्रिटिश सरकारविरोधात लढत राहिले. ती लढाई विचारांची होती. फुले दाम्पत्याची लढाई अद्याप संपलेली नाही. जोतिबा-सावित्रीबाईंना आणखी किती संघर्ष करावा लागेल? असा प्रश्‍न संजय राऊत यांनी आपल्या स्तंभातून विचारला आहे.

Protected Content