शेंदुर्णी, ता. जामनेर-विलास अहिरे | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तालुक्यातील मोठे प्रस्थ मानले जाणारे नेते संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते हजारो समर्थकांसह ना. गिरीशभाऊ महाजन यांची साथ धरणार आहेत.


जामनेर मतदारसंघातून ना. गिरीश महाजन यांना तीन वेळेस अतिशय तगडे आव्हान उभे करणारे आधी कॉंग्रेसचे तर नंतर राष्ट्रवादी आणि अलीकडेच शरद पवार गटात असलेले नेते संजय गरूड यांनी आता राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून या निर्णयावर त्यांचा खल सुरू होता. आधी त्यांनी निकटवर्तीयांच्या सोबत चर्चा केली. नंतर अलीकडेच आपल्या समर्थकांची मोठी बैठक घेऊन त्यांनी मते जाणून घेतली. यात त्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने संजयदादा गरूड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून ते मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे ना. गिरीश महाजन यांनी बेरजेच्या राजकारणाचे एक मोठे उदाहरण यातून दाखवून दिले आहे. तर जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजयदादा गरूड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


