संजय दत्तने राजकारणात प्रवेशाची शक्यता फेटाळली

5d0ge3r sanjay dutt ndtv 625x300 17 July 19

मुंबई, वृत्तसंस्था | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या राजकारण प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे. ‘राजकारणात उतरण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा माझा अजिबात विचार नाही,’ असे त्याने स्पष्ट केले आहे.

 

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मुंबईत झालेल्या एका सभेत संजय दत्तच्या राजकारण प्रवेशावर भाष्य केले होते. संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी रासपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत तो पक्षाचा प्रचार करेल, असे त्यांनी म्हटले होते. जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जानकर यांच्या वक्तव्याला बळकटी मिळाली होती. खरंच संजूबाबा ‘रासप’मध्ये जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र, संजयने ती शक्यता फेटाळली आहे.

‘जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही,’ असे त्याने एका निवेदनात म्हटले आहे. संजय दत्तसाठी राजकारण नवे नाही. त्याचे वडील व दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या तिकिटावर ते मुंबईतून अनेकदा खासदार म्हणून निवडून आले होते. केंद्रात त्यांनी काही काळ मंत्रिपदही भूषवले होते. संजय दत्तची बहीण प्रिया दत्त यांनीही खासदार म्हणून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, संजय दत्तने स्वत:ही समाजवादीच्या तिकिटावर लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा याआधी विचार केला होता. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.

Protected Content