अहो साहेब थांबा : अडावदात जमावाने अडविला संजय ब्राह्मणे यांचा ताफा !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येण्याआधीच वंचित बहुजन आघाडीचे रावेरातील उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून तालुक्यातील अडावद येथे त्यांच्या सोबत अनोखी घटना घडली.

शनिवारी संजय ब्राह्मणे यांनी चोपडा तालुक्यातल्या ग्रामीण भागातील प्रचार आटोपून ते आपल्या ताफ्यासह यावलकडे निघाले. याप्रसंगी अडावद येथे मोठ्या जमावाने त्यांचा ताफा अडवून गावात प्रचार फेरी काढण्याची मागणी केली. यामुळे ब्राह्मणे यांना पुढील कार्यक्रम रद्द करून अडावदमधील ग्रामस्थांशी संवाद साधावा लागला.

याप्रसंगी अडावदमधील आदिवासी, अल्पसंख्यांक आणि आंबेडकरी समुदायातील स्त्री-पुरूषांनी त्यांना भेडसावत असणार्‍या समस्यांचा पाढा वाचला. यावर संजय ब्राह्मणे यांनी आपण निवडून आल्यावर या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तर, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शमिभाताई पाटील यांनी आक्रमक शैलीत प्रस्थापित उमेदवारांवर टिका करत वंचित हा गोरगरीब आणि शोषितांसाठी एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्यासाठी पक्षाचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे निर्णायक टप्प्यात भव्य सभा घेणार असून यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही सभा केळी पट्टयात घेण्यात येईल असे समजते.

Protected Content