मुंबई–लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा। भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांची लेक अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लिंग परिवर्तनानंतर प्रसिद्ध झालेली अनाया आता देशातील सर्वाधिक चर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीजन १९’ मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सलमान खान होस्ट करत असलेला हा शो २४ ऑगस्ट २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अनायाचं या शोमध्ये प्रवेश करणं ही खऱ्या अर्थानं एक मोठी बातमी मानली जात आहे.
पूर्वी आर्यन बांगर म्हणून ओळखली जाणारी अनाया युनायटेड किंग्डममध्ये हार्मोन ट्रान्सप्लांट करून भारतात परतली आणि तिने स्वतःचं आयुष्य नव्याने उभारायला सुरुवात केली. अनायाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत असे वक्तव्य केले की, तिला भारतातील काही क्रिकेटपटूंनी अश्लील संदेश पाठवले होते आणि शारीरिक संबंधांची मागणी देखील केली होती. या धक्कादायक खुलाशांमुळे ती प्रकाशझोतात आली होती. तिच्या या वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली.

अनायाने या क्रिकेटपटूंबाबत कोणतीही नावं घेतलेली नसली तरी तिच्या विधानांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली. कपडे न घातलेल्या फोटोसह गाडीमध्ये चल बोलण्यापर्यंतची ऑफर्स मिळाल्याचं तिनं सांगितलं होतं. तिचं हे धाडसी वक्तव्य तितकंच वादग्रस्तही ठरलं. आता अशी चर्चा आहे की बिग बॉसच्या व्यासपीठावर ती या संपूर्ण प्रकरणावर अधिक खुलासा करू शकते, आणि हेच या सीजनमधील प्रमुख आकर्षण ठरू शकतं.
बिग बॉसचा प्रत्येक सीजन हा नवा वळण घेणारा ठरतो, आणि स्पर्धकांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या संघर्षाच्या कथा प्रेक्षकांसमोर येतात. अनायाचं आयुष्य हे त्याचे एक अत्यंत बोलके उदाहरण आहे. तिने स्वतःचं अस्तित्व समाजात प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला धाडसी निर्णय, त्यानंतरच्या संघर्षांची शर्थ, आणि आता मनोरंजनाच्या क्षेत्रात ती करत असलेली वाटचाल — हे सगळं प्रेक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटींनी आपलं खऱ्या अर्थाने रुप दाखवलेलं आहे. आता अनायासारख्या धाडसी व्यक्तिमत्त्वाचं तिथं येणं, निश्चितच या शोसाठी गेमचेंजर ठरू शकतं. निर्माता आणि चॅनेलकडून यंदाच्या सीजनमध्ये अधिक गाजलेली, बोल्ड आणि चर्चित व्यक्तिमत्त्वं आणण्याचा प्रयत्न आहे. अनाया त्यात अग्रेसर ठरणार हे नक्की.



