जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचे निर्देश दिल्यानंतर जामनेर शहरातील इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक स्कूलने तत्काळ दखल घेत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात सुरक्षित, स्वच्छ व सन्मानपूर्वक सुविधा मिळणार असल्याने पालक व शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.
महिलांसाठी मासिक पाळीतील आरोग्य ही केवळ वैद्यकीय गरज नसून जीवन, प्रतिष्ठा व आत्मसन्मानाशी जोडलेली बाब आहे. आजच्या काळात शिक्षण, नोकरी व विविध उपक्रमांसाठी मुलींना घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत शाळा स्तरावरच योग्य सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक ठरते. इंदिराबाई ललवाणी शाळा ही शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची व आरोग्याची तितकीच काळजी घेणारी संस्था म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे या शाळेत मुलींची संख्या लक्षणीय असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

या सुविधांचा योग्य व सुरक्षित वापर व्हावा यासाठी शाळा प्रशासनाने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनमधून पॅड कसे घ्यायचे तसेच वापरलेले पॅड योग्य पद्धतीने डिस्पोजल मशीनमध्ये कसे टाकायचे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखवण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींना डिजिटल बोर्डवर व्हिडीओच्या माध्यमातूनही सविस्तर माहिती देण्यात आली, जेणेकरून कोणतीही शंका न राहता त्या सुविधा सहज वापरू शकतील.
यावेळी विद्यार्थिनींना संकोच न करता महिला शिक्षकांशी संपर्क साधून या सुविधांचा वापर करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज व संकोच दूर करून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.
या अभिनव व संवेदनशील उपक्रमाबद्दल इंदिराबाई ललवाणी शाळेचे व्यवस्थापन व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, इतर शैक्षणिक संस्थांनीही असा आदर्श उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



