चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसीम येथील तितूर नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांना तहसीलदारांनी तब्बल ६.८८ कोटी रूपयांचा दंड ठोठावल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, हिंगोणेसीम येथील तितूर नदीपात्रातील अवैध वाळूच्या उपशाचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांच्यावर २२ जानेवारी रोजी पोलीस स्थानकात गुन्हादेखील दाखल झाला आहे. मात्र प्रशासनाने या प्रकरणाचे गांभिर्य ओळखले नसल्याचा आरोप करत हिंगोणेसीम येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या अनुषंगाने आज तहसीलदार कैलास देवरे यांनी एका नोटिशीच्या माध्यमातून प्रभाकर चौधरी यांना दंड ठोठावला आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार तितूर नदीपात्रामध्ये ३३४० ब्रास वाळूचा उपसा केल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रति-ब्रास ३४९२ रूपयांप्रमाणे याचे एकूण मूल्य हे १,१६,२८,३६० रूपये झाले आहे. आणि शासकीय नियमानुसार याच्या पाच पटीने दंड वसूल करण्याची तरतूद आहे. यामुळे प्रभाकर चौधरी यांना महसूल प्रशासनाने तब्बल ६,८८,४४,४२० (सहा कोटी अठ्ठयाऐंशी लाख चौरेचाळीस हजार चारशे वीस रूपये) इतका दंड ठोठावला आहे. याबाबत प्रभाकर चौधरी यांच्याकडून सात दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला असून यानंतर दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, वाळू तस्करीबाबत इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर हिंगोणेसीम येथील ग्रामस्थ मात्र अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे या प्रकरणातील गुंता वाढल्याचे दिसून येत आहे.
ताजे अपडेट – प्रांताधिकार्यांशी झालेल्या चर्चेनंतर आज सायंकाळी हिंगणेसीम ग्रामस्थांनी उपोषणाची सांगता केली.