चाळीसगावच्या वाळू तस्कर माजी नगरसेवकावर मोक्का अंतर्गत कारवाई करा- मुंडे

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे येथील नदीपात्रातून केल्या गेलेल्या कोट्यावधी रुपयांच्या वाळू तस्करी प्रकरणी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका पत्रान्वये केली आहे.

हिंगोणे ग्रामस्थांचे साकडे

महसूल व पोलिस प्रशासनाने संबंधित वाळू तस्कर माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर फक्त ३७९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फक्त एक डंपर वाळू चोरल्याचे नमूद केले असल्याने हिंगोणे येथील ग्रामस्थांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. या वाळू तस्करांना पोलीस व महसूल प्रशासन संगनमताने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे एका तक्रारीद्वारे करून दाद मागितली आहे. यात संबंधित वाळू तस्कर आपला हस्तकांकरवी गावात दहशत पसरवत असून त्यापासून गावकर्‍यांना धोका निर्माण झाल्याचेही म्हटले आहे. हिंगोणे ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना संबंधीत प्रकरणी संघटित गुन्हेगारी कायदा नुसार संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली असून याबाबत विधीमंडळात आवाज उठविणार असल्याचेही म्हटले आहे.

पंचनामा बोगस

हिंगोली येथील नदीपात्रातून वास्तविक ३०० कोटी रुपयांच्या जवळपास बाजार भाव इतक्या वाळूची तस्करी झाल्याचे प्रत्यक्ष जागेवर निदर्शनास येते मात्र सदर वाळू तस्करास राजाश्रय असल्याने संबंधित प्रशासनावर दबाव असल्याने त्याला पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की चोरीचा पंचनामा करताना फक्त ५२ हजार घनफूट वाळू चोरी गेल्याचा अहवाल तयार केला आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० मीटर लांब ५०० मीटर रुंद ६ मीटर खोल असा अवैध उपसा म्हणजेच १५ लाख घनफूट वाळू या नदीपात्रातून चोरी झाल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले आहे. मात्र अधिकार्‍यांनी पंचनाम्यात शासनाची फसवणूक केली असून अशा शासनाच्या फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक मालमत्ता हनी अधिनियम १९८३ मधील कलम ३ जैविक विविधता कायदा २०१२ अ‍ॅक्ट १९६७ मधील कलम ३, १०, व ११ मनी लाँड्रींग कायदा २००२ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी या कायद्यानुसार वर संबंधित वाळू तस्कर प्रभाकर पांडुरंग चौधरी व त्याचे साथीदारांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या प्रकारची कारवाई न झाल्यास आपण या संबंधात विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

One Response

  1. Hemant Purushottam bhoite

Add Comment

Protected Content