अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खरदे ते वासरे रस्त्याच्या दरम्यान चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला वाळूच्या ट्रॅक्टरने धडक देऊन उडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळजनक उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव हे तहसीलदारांचे वाहन क्रमांक (एमएच १९. सीव्ही ४१८) मधून वाळू चोरीला रोखण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात बुधवार रात्रीपासून गस्त घालत होते. आज (दि ९) पहाटे खरदे ते वासरे रस्त्यावर वाळूने भरलेले ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९,८०७) दिसल्यानंतर पथकाने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू ट्रॅक्टर चालक भीमराव कैलास वानखेडे याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.