फडणविसांनी वेदनांवर संयमाचा बाम लावावा- शिवसेनेचा खोचक सल्ला

devendra fadnavis cm 696x348

मुंबई प्रतिनिधी । सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वेदनांवर संयमाचा बाम लाऊन काही काळ शांत रहावे असा खोचक सल्ला आज शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामना मधील आजच्या अग्रलेखातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही. श्री. फडणवीस यांचे हे असे का झाले आहे, ते महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. सत्ताधाऱयांवर ते रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत असल्यात यात नमूद करण्यात आले आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे ती, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किमान संयमाची व विरोधी पक्षाची प्रतिष्ठा राखण्याची अपेक्षा जनता करीत आहे. या पदाची किंमत त्यांनीच ठेवली पाहिजे. ती जबाबदारी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची नाही.  फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असे भन्नाट आरोप करून ङ्गठाकरे सरकारफ पडणार नाही. उलट तीन पक्ष अधिक घट्ट होतील. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी ङ्गविरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्यफ अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. मेहक प्रभू या मुलीने झळकविलेल्या फ्री कश्मीर फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमकं काय केलं, हे स्पष्ट झाल्यावर ते तोंडावर आपटले. विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्‍वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते असे यात शेवटी म्हटले आहे.

Protected Content